नाशिक (प्रतिनिधी) : मढी येथे राहणाऱ्या ३ वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीला तिच्या आजी-आजोबांसमोर फरफटत जंगलात नेले. या हल्ल्यादरम्यान अजून एक महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर पाथर्डीमध्ये उपचार सुरू आहेत.
बुधवारी (दि.१४ऑक्टोबर) रोजी रात्री विजय सावळे यांची पत्नी उषा सावळे घराबाहेर आल्यावर बिबट्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. विजय यांनी प्रतिकार करून, पत्नीची बिबट्यापासून सुटका केली. मात्र या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. काही वेळाने श्रीधर सावळे यांची नात श्रेया साळवे लघुशंकेसाठी घराबाहेर पडली असतांना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिचा आरडाओरडा ऐकून आजी आजोबा देखील धावले. त्यांनी प्रतिकार केला. मात्र, आजी-आजोबा देखत बिबट्या तिला ओढून, फरफट घेऊन गेला. रात्रभर शोध घेऊन देखील श्रेया सापडली नाही.दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी घरापासून सुमारे १ किमी अंतरावर तिचा मृतदेह दरीत सापडला.