16 जूननंतर मान्सून गोवा व सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
राज्यात शुक्रवारी उन्हाची तीव्रता वाढलेली होती. त्याचप्रमाणे आर्द्रता वाढल्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण होते. विदर्भ आणि कोकणातही १५ जूनपर्यंत उष्णता व दमटपणा वाढलेला राहील. १६ जूननंतर मान्सून गोवा व त्यापाठोपाठ सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला.
‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या बाह्य परिघातून निघालेल्या वाऱ्यांमुळे नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत ताशी २५ ते ३० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली.
उच्च परिघात आर्द्रता:
अति उष्णता म्हणजे अति आर्द्रता हे हवामान शास्त्रीय सूत्र आहे. सूर्यकिरणांमुळे जमिनीवर निर्माण झालेल्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यात ढग कमी असल्याने सूर्यकिरणांची तीव्रता जास्त आहे. परिणामी उच्च परिघात अति आर्द्रता अाहे. संपूर्ण राज्यात पुढील ५ दिवस नागरिकांना अशाच वातावरणाचा सामना करावा लागेल, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.