नाशिक (प्रतिनिधी): शहरातील ठक्कर डोम येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी प्रसार माध्यमांच्या दोन प्रतिनिधींना बेदम मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाण, पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरील फुटेजच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्रसार माध्यमाचे कॅमेरामन आकाश येवले यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता. १६) त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेतर्फे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही वृत्त संकलनासाठी उपस्थित होते. या वेळी येवले हे कार्यक्रमाचे शूटिंग करत असताना २० ते २५ वयोगटातील पाच ते सहा अज्ञात संशयितांनी अचानक हल्ला चढविला.
या हल्लेखोरांनी येवले यांच्यासह कॅमेरामन अशोक गवळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्याकडील कॅमेऱ्याचेही नुकसान झाले आहे. जखमी दोघांना पत्रकारांना तत्काळ सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती कळताच गंगापूरचे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत माहिती घेतली आणि कार्यक्रम स्थळावरील फुटेजच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.