नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप

नाशिक (प्रतिनिधी): चारित्र्याच्या संशयातून पत्नीस मारहाण करून गळा दाबून खून करणार्‍या वासाळी येथील आरोपीस कोर्टाने भा. दं. वि. 302 अन्वये जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

याबाबत माहिती अशी, की वासाळी येथील रहिवासी बाळू पंडित खेटरे (वय 35) याने पत्नी वैशाली (वय 27) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन “दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी तू कुठे गेली होतीस?” असे विचारून तिला जबरदस्त मारहाण केली व गळा दाबून जिवे ठार मारले. दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी घडलेल्या या हत्येविषयी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

त्याचा तपास तत्कालीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. के. नागरे व उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे यांनी करून खटला कोर्टात पाठविला होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 6 चे न्या. आर. आर. राठी यांच्यासमोर चालले. कोर्टाने परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर निकष लक्षात घेऊन आरोपी बाळू खेटरे यास भा. दं. वि. कलम 302 अन्वये जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. योगेश डी. कापसे, अ‍ॅड. रेश्मा जाधव व अ‍ॅड. राजेंद्र बगडाणे यांनी काम पाहिले. हत्येच्या यशस्वी तपासाबद्दल पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे व वरिष्ठ अधिकार्‍यांनी तपासी अंमलदार व इतर संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790