नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नाशिकरोड येथील एकलहरारोडवर रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला २ जणांमध्ये किरकोळ वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान प्रकाश ढाले या तरुणाच्या डोक्यात बेसबॉलच्या बॅटचा लाकडी दांडा मारण्यात आल्याने जखमी झालेल्या प्रकाशचा मृत्यू झाला.
प्रकाश शंकर ढाले (वय ३६) हे मंगळवारी (दि.२७) रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने एकलहरारोड जवळून घराकडे चालले होते. दरम्यान ट्रॅक्शन कारखाना गेटजवळ संभाजीनगर येथे राहणारा बाळासाहेब शिंगार व प्रकाश यांच्यात किरकोळ वाद निर्माण झाला. या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली असता, बाळासाहेब शिंगारने फोन करून सागर शिंगार आणि दिनेश शिंगार यांना बोलवले. दोघांच्या हातात बेसबॉलची लाकडी बॅट होती. त्यांनी दुचाकीवरून उतरून लाथा-बुक्क्यांनी प्रकाशला मारहाण केली. सागरने लाकडी दांडके प्रकाशाच्या डोक्यात मारल्याने प्रकाश गंभीर जखमी झाला. दरम्यान राहुल जमधाडे, रवी अशोक चांदणे, आबा सोनवणे यांनी प्रकाशला बिटको रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून प्रकाशला मृत घोषित केले. सदर खुनाच्या गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली असून, संशयिताला ताब्यात घेतले आहे.