शेतकऱ्यांना 1 हजार 639 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप

मागील वर्षाच्या तुलनेत 156 कोटी रुपये जास्त कर्ज वितरित…!

नाशिक (प्रतिनिधी): अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 639 कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 156 कोटी जास्त कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले, 12 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा आज झालेल्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. 3 हजार 303 कोटी कर्जाच्या उद्दिष्टापैकी 2 हजार 400 कोटी कर्जाचे वाटप 10 बँकांकडे आहे. त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने 271 कोटीचे वाटप केले होते, आजपर्यंत ते 318 कोटी पर्यंत करण्यात आले आहे. याचप्रमाणे आजपर्यंत एनडीसीसी बँकेने 270 कोटी, बँक ऑफ बडोदा 263 कोटी, बँक ऑफ इंडिया 66 कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया 112 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 265 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 74 कोटी तसेच एचडीएफसी 3 कोटी व कोटक महिंद्रा 6 कोटी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या तुलनेत 156 कोटी रुपयांची वाढ पीककर्ज वाटपात झाली असून गेल्या 10 ते 12 दिवसात शेतकऱ्यांना साधारण अडीशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. इगतपुरी व जिल्ह्याचा पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  मांढरे यांनी बँकांना दिल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: हायवेला ढाब्यांवर दारू रिचविणाऱ्यांची आता काही खैर नाही !

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 176 कोटींचे कर्ज वाटप:
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत 1 हजार 267 कोटी प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना 176 कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात 34 टक्के इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण लक्षांकापर्यंत जाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँकांनी पीककर्ज वाटपासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790