जयेश साबळे, महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप, नाशिक
शहरात पाणी प्रश्नावरून भाजप-शिवसेनेत चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्याचे पडसाद महासभेत दिसून आले तर, हा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढत असून शिगेला पोहचला आहे. तर, दुसऱ्या बाजूला शहरातील महत्वाच्या २ प्रस्तावित मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलांना स्थगिती देऊन महापौर सतीश कुलकर्णी यांनी शिवसेनेला मोठा धक्काच दिला आहे.
शहरातील २ उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागातील आहे. त्यामुळे महापौरांनी या उड्डाणपुलाला स्थगिती दिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे निधीच्या कमतरतेमुळे उड्डाणपुलापेक्षा शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील विकासकामे महत्वाचे असल्यामुळे या उड्डाणपुलाला आयुक्तांनी स्थगिती दिल्याचा खुलासा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामावरून भाजप व सेनेत संघर्ष दिसून येत आहे. शहरातील नवीन नाशिक भागातील त्रिमूर्ती चौक ते संभाजी नगर पर्यंत उड्डाणपुलाला सत्ताधारी भाजपकडून मंजुरी देण्यात आली होती.
त्यातच आता अचानक सदर पुलाला स्थगिती का देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत, भाजप विकासकामांच्या आड राजकारण करत आहे. असा पलटवार शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे. तर, भाजप व सेनेतील संघर्षामुळे शहरातील विकासकामे थांबायला नकोत अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.