महत्वाची बातमी: या तारखांना बँक कर्मचारी संपावर जाणार !
नाशिक (प्रतिनिधी): या महिन्यात तुमची बँकेसंबंधित कामे असली तर त्यांचे नियोजन आत्ताच केलेले सोयीचे ठरेल कारण, १६ आणि १७ डिसेंबरला राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज बंद असणार आहे.
बँकांच्या शाखांसह क्लिअरिंगचे कामही बंद असणार आहे.
केंद्र सरकारने सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन बँकांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू केल्याने देशभरातील बँकिंग कर्मचाऱ्यांत संताप असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने १६ आणि १७ डिसेंबर रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्राने बँकांच्या खासगीकरणाचा धडाका लावल्याने बँकिंग कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून संतप्त असून आंदोलनाचा मार्ग अवलंबत आहेत. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट अॅक्टअंतर्गत दोन बँकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात कोणत्या बँका आहेत, हे समोर आलेले नसले तरी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे.
काय होणार परिणाम:
लागोपाठ दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार असून ग्राहकांना बँकेची कामे शाखांत जाऊन करता येणार नाही. बहुतांश एटीएम ड्राय होण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबर गुरुवार तर १७ डिसेंबरला शुक्रवार असून १८ डिसेंबरला शनिवारी बँक सुरू राहील मात्र लगेचच १९ डिसेंबरला रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने सलग चार दिवसांत केवळ एकच दिवस बँका सुरू राहतील. खासगी व सहकारी बँका जरी सुरू राहणार असल्या तरी सर्व राष्ट्रीयीकृत बँका बंद राहणार आहेत.
नाशिकमध्ये असेल ही स्थिती:
नाशिकमधील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील या बँकांचे कामकाज बंद असेल, ३,५०० पेक्षा अधिक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. एटीएम, ऑनलाइन व्यवहार मात्र सुरू राहतील, अनेक बँकांचे एटीएम ड्राय होण्याची शक्यता आहे.
३५०० कर्मचारी सहभागी होणार:
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांतील साडेतीन हजार कर्मचारी संपात उतरणार आहेत. स्टेट बँकेच्या जिल्ह्यात १२५ शाखा असून त्यांचे कामकाज ठप्प हाेईल तसेच ४८ तास क्लिअरिंगही ठप्प राहील. -शिवा भामरे, डेप्टी जनरल सेक्रेटरी, एसबीआय मुंबइ सर्कल