नाशिक: पैसे तिप्पट करून देण्याचा बहाणा करून ७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला अटक
नाशिक (प्रतिनिधी): पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आल्याचे समजते.
याबाबत पोलिसांनी सांगितलेला तपशील असा की, औरंगाबाद येथील मोईज फिदाअली सैफी यांच्या किरकोळ ओळखीच्या एका महिलेने त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आपल्याकडे पैसे तिप्पट करून देणारी पार्टी आहे असे सांगून सैफी यांना 11 मार्च रोजी नाशिकला 7 लाख रुपये घेऊन बोलावले.
या 7 लाखांचे 23 लाख रुपये मिळतील त्यापैकी 1 लाख रुपये कमिशन सदर महिलेला द्यावे लागतील असे सांगितले.
म्हणून सैफी व त्याचा मित्र 7 लाख रुपये घेऊन नाशिकला आले. सदर महिलेस फोन केला असता तिने त्यांना पंचवटीतील भक्तीधाम जवळ बोलावले. तेव्हा तिच्या सोबत त्या महिलेचे काका म्हणून शिवाजी राघु शिंदे भेटले. सदर महिलेने पैसे तिप्पट करून देणाऱ्या पार्टीस फोन केला असता त्याने सदर महिला व सैफी यांना अमरधाम रोड वरील हॉटेल चटक मटक जवळ बोलावले. तेथे गेल्यावर त्यांना एक इसम भेटला. त्याने सैफी यास पैसे दाखविण्यास सांगून गाडीच्या बाहेर बोलावले.
- नाशिक: पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा ‘या’ रिसॉर्टवरील हुक्का पार्टीवर छापा
- नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. १५ मार्च) व बुधवारी पाणीपुरवठा बंद
त्याचवेळी तेथे सिल्वर रंगाच्या तवेरा गाडीतून काही इसम येऊन त्यांनी सैफी यांच्याकडील 7 लाख रुपये असलेली बॅग घेऊन ते दोन्ही इसम तवेरा गाडीतून पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सैफी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांनी तातडीने तपास करून रेणुका शिवदास दिवेकर (रा. फुलेनगर) व शिवाजी राघू शिंदे (रा. भराडवाडी) या दोघांना अटक केली. त्यांचे साथीदार तेजस उर्फ बंटी वाघ, योगेश उर्फ म्हसोबा क्षीरसागर व इतर यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक देवरे पुढील तपास करीत आहेत.