नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांवर; नगरमुळे वाढली नाशिकची चिंता
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत आली होती. मात्र,आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
विशेष करून निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून शेजारच्या नगर जिल्ह्यामुळे नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने तातडीने उपययोजना राबविण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर बोलताना भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली असून याबाबत भुजबळांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही २.८ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर गेला असून पॉझिटिव्हिटी दरात राज्यात नाशिक पाचव्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात रुग्णसंख्या नियंत्रणात असली, तरी निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून कार्यक्रमांना होणारी गर्दी, तसेच बाजूच्या जिल्ह्यांमधून नागरिकांची ये-जा होत असल्याने ही रुग्णसंख्या वाढत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.