नाशिक (प्रतिनिधी): एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने युवतीच्या घरात बळजबरीने प्रवेश करत तिला माझ्यासमोर आणा, नाही तर तिला जिवे ठार मारेन अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयित देवेंद्र ऊर्फ सुंदर सुधाकर (रा. सातपूर) याच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार,२०१७ पासून दहावीत शिक्षण घेत असताना शाळा सुटल्यानंतर संशयित पाठलाग करत घरापर्यंत येत असे. भीतीपोटी ही बाब कुणास सांगितली नाही. संशयिताने दोन दिवसांपूर्वी बळजबरीने घरात प्रवेश केला. कुटुंबियांना शिवीगाळ केली. पीडित युवतीला पकडून बळजबरीने घराबाहेर ओढले.तू माझ्यासोबत चल, नाही तर तुझा खून करून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.