पेठ तालुक्यात बिबट्याच्या हल्यात तरुण ठार

नाशिक (प्रतिनिधी): पेठ तालुक्यातील हरणगाव पैकी वडबारी येथील शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.

रवींद्र वामन गावित (वय ३३, रा. हरणगाव) रविवारी (ता. २७) पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वत:ची जनावरे चारण्यासाठी वडबारीच्या रानात गेला होता. सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान रवींद्र चहा-नास्त्यासाठी घरी न आल्याने घरच्या लोकांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

यामुळे नातेवाइकांसह ग्रामस्थांनी जंगलात शोधशोध केली असता, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रवींद्रवर हल्ला केलेला छिन्नविछीन्न मृतदेह वडबारीच्या फरशी नाल्याजवळ गोवर्धन जाधव यांच्या शेताजवळ आढळून आला. बिबट्याने रवींद्रची मांडी, खांदा व गळा फाडल्याचे निर्दशनास आले.

मृतदेह विच्छेदनासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पोलिस पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे हरणगाव वडबारी, आसरबारी, नडगदरी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“हरणगावच्या तरुणाला हल्ला करून बिबट्याने जागीच ठार केले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जंगलात बिबट्या बछडासह फिरतात, अशी माहिती ग्रामस्थांकडून समजली. नागरिकांच्या मागणीनुसार परिसरात पिंजरा व कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ही कार्यवाही नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत जंगलात वावरताना लहान मुलांसह नागरिकांनी सावधानता बाळगावी.” -श्रीमती सविता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here