महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पेपर क्रमांक दोन येत्या रविवारी (ता. २९) नियोजित आहे. परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जारी करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संयुक्त परीक्षेतील पेपर क्रमांक एक घेण्यात आला होता. आता पदनिहाय मुख्य परीक्षेचे पेपर क्रमांक दोन पार पडत आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार पोलिस उपनिरीक्षक पदासाठी रविवारी (ता. २९) पेपर क्रमांक दोन राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
परीक्षार्थींनी प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आयोगाने जारी केलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे.
परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास आधी परीक्षार्थीनी उपस्थित राहावे.
ओळखीच्या पुराव्यासाठी मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्ट दिसेल, अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी, इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही, असेही सूचनापत्रकात नमूद केले आहे.