नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहराची वाढती लोकसंख्या व उद्योगांसाठी आवश्यक पाण्याचा विचार करून १५ जुलै २०२४ पर्यंत नाशिक शहरासाठी गंगापूर, दारणा व मुकणे या धरणांतील एकूण ६,१५९ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
गंगापूर धरणातून जायकवाडीला ५०० दलघफू पाणी सोडल्यास नाशिककरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले जाण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात आकस्मिक पाणी आरक्षण बैठक पार पडली. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व्यासपीठावर उपस्थित होते. नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणांतून पाणीपुरवठा होतो.
या धरणांतील साठ्याच्या आधारे शहरासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यात पिण्यासाठी ४,२६५ दलघफू, तर उद्योगांसाठी ७७७ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. गंगापूर धरणात सध्या ५,१३० दलघफू साठा आहे. यातून ५०० दलघफू पाणी जायकवाडीला सोडल्यास नाशिक शहराला पुरवठा करणे शक्य होणार नाही.
परिणामी, शहराच्या पाण्यात कपात करावी लागेल. त्यापेक्षा गंगापूर धरणाऐवजी मुकणे धरणातून ३०० दलघफू पाणी देण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. यासंदर्भात गंगापूर धरणासमूहातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याच्या आधारे जायकवाडीला पाणी सोडण्याचा विचार होतो. मुळात गंगापूर धरण समूहातील आळंदी धरणाचे पाणी शहराला मिळत नाही. त्यामुळे या धरणास गंगापूर धरण समूहातून वगळण्याची मागणी आमदार फरांदे यांनी जलसंपदा विभागाकडे केली.
धरणातील पाणी आरक्षण (दलघफू):
गंगापूर, काश्यपी व गौतमी गोदावरी: ४,४२२
दारणा व मुकणे: १,७३७
एकूण: ६,१५९