नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मंदिरात पूर्व दरवाजा दर्शनबारीने गर्दीच्या कालावधीत चार ते पाच तास वेळ लागतो. त्यामुळे भाविक दर्शनाचा दोनशे रुपयांचा व्हीआयपी पास खरेदी करतात. मात्र, त्यासाठीही दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. यासाठी देवस्थान ट्रस्टने आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
ट्रस्टने आता दोनशे रुपये व्हिआयपी पासची ऑनलाइन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी https://trimbakeshwartrust.com या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. यामध्ये तारीख आणि वेळेचे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्रतिव्यक्ती दोनशे रुपये शुल्क असून, दहा वर्षांखालील बालक, दिव्यांग भक्त तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना शुल्क लागणार नाही. बुकिंग केलेला व्हीआयपी पास डाउनलोड करता येणार आहे. प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असल्याने हा व्हीआयपी पास हस्तांतरण करता येणार नाही.
भाविकांना दोनशे रुपये पास घेऊन दर्शनाची इच्छा असल्यास त्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर दरवाजाच्या समोर, कुशावर्त तीर्थ आणि वाहनतळाच्या जवळ असलेले शिवप्रासाद भक्त निवास या तीन ठिकाणी व्हीआयपी पास घेता येणार आहे. त्यासाठी भक्तांना आधारकार्ड, पॅनकार्ड ओळखपत्र द्यावे लागेल. शिवाय, बायोमेट्रिक बोटांचे ठसे, चेहऱ्याचे स्कॅनिंग करावे लागणार असून, त्यानंतर बारकोड असलेला पास देण्यात येईल. याशिवाय, भक्तनिवास रूम बुकिंग, लघुरूद्र आणि रूद्राभिषेक पूजा बुकिंगही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन व्हीआयपी पास बुकिंगसह अन्य सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे संगणकीय काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या सुविधा सुरू होतील. – रुपाली भुतडा, विश्वस्त