नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारपासून व्हॉट्सअपवर कर्फ्यू बाबत संभ्रमात टाकणारे मेसेज फिरत आहेत. यात टीव्ही ९ मराठीच्या जुन्या बातम्यांचे स्क्रीनशॉटस आहेत. खरं म्हणजे जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लागला त्यावेळी टीव्ही ९ मराठी या चॅनेलवर याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. सध्या व्हॉट्सअपवर फिरत असलेले स्क्रीनशॉटस हे त्या बातमीचे आहेत.
नाशिक शहरात किंवा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे जनता कर्फ्यू किंवा नव्याने कुठलेही निर्बंध प्रशासनाने अद्याप लागू केलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व मेसेज खोडसाळपणाने पसरविण्यात आलेले आहेत. याबाबत टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांना कल्पना दिली असून, जे कुणी अशा अफवा पसरवत असतील त्यांना शोधून लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे समजते. अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला आले असतील तर ते कृपया कुणालाही फॉरवर्ड करू नका आणि अफवा पसरवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.