जॉगिंग ट्रॅक, गॅबीयन वॉल, बॉक्स कल्व्हर्ट, पुलांवर संरक्षक जाळ्यांच्या कामांना मंजुरी

४ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध, शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे मोठे यश

नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर येथील जॉगींग ट्रॅकचे नूतनीकरण, उंटवाडीत नंदिनी नदीच्या कडेला गॅबीयन वॉल, कोठावळे मळ्यात बॉक्स कल्व्हर्ट, तसेच मुंबई नाका येथील पूल व मंगलमूर्ती नगर येथील शिवालय कॉलनीतील नाल्यावर संरक्षक जाळी या प्रभाग २४ मधील कामांना महापालिकेची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या एकूण ४ कोटी ७० लाख ६० हजार ६२८ रुपयांच्या निविदा निघाल्या असून, बुधवार, दि. २६ एप्रिल २०२३ रोजी त्या संकेतस्थळावर दिसणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे.

सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने वरील कामांसाठी प्रयत्न करण्यात आले. दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीकिनारी संरक्षक भिंत (गॅबीयन वॉल) बांधावी, यासाठी दि. ३१ मे व १६ नोव्हेंबर २०२१ ला निवेदने देण्यात आली. अधिकार्‍यांच्या पाहणीनंतर ८ डिसेंबर २०२१ ला यासाठी १ कोटी ६४ लाख ८९ हजार १४४ रुपयांचे प्राकलन करण्यात आले. त्यासाठी पैसे नसल्याने अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी १४ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली. तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची तरतूद केली. त्यानुसार पुन्हा प्रस्ताव करण्याची मागणी १८ एप्रिल २०२२ ला करण्यात आली. बदललेली दर सूची व जीएसटीसह २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात वाढीव रक्कमेसह एकूण दोन कोटींची तरतूद धरण्यात आली आहे. तब्बल तेवीस महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या कामासाठी १ कोटी ९७ लाख ४९ हजार २२५ रुपयांची ई-निविदा निघाली.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकला संरक्षक भिंत बांधावी, नूतनीकरण करावे, यासाठी दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी निवेदन दिले. यासाठी आर्थिक तरतुदीची मागणी १४ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आली. ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ७५ लाख रुपयांची तरतूद केली. १८ एप्रिल व २५ एप्रिल २०२२ रोजी या कामाचा प्रस्ताव करण्याचे निवेदन दिले. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी ७४ लाख ८३ हजार ४६१ रुपयांचा प्रस्ताव तयार झाला. दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ही ई-निविदा निघाली.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

बडदेनगर, पाटीलनगर १८ मीटर रस्त्यालगत कोठावळे मळ्यात सर्व्हे नं. ९६७/९६६ जवळच्या नाल्यावर बॉक्स कल्व्हर्टसाठी दोन कोटींची तरतूद प्रशासनाने केली होती. मात्र, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत नव्हता. यासाठी ९ जून २०२२ रोजी यासंदर्भात आयुक्तांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता (सपना थिएटरजवळील १८.०० मीटर रोडलगत संरक्षक भिंत व बॉक्स बांधणे) या कामाची १ कोटी ९० लाख ४५ हजार ८०६ रुपयांची निविदा काढण्यात आली. मुंबई नाका येथे डेटामॅटिक्सजवळील पुलावर दोन्ही बाजूला, तसेच मंगलमूर्तीनगर येथे खांडे मळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील नाल्यावर संरक्षक जाळी बसविण्याची मागणी करण्यात आली, वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या कामांसाठी ७ लाख ८२ हजार १३६ रुपयांची निविदा मंजूर झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

या सर्व कामांसाठी आर्थिक तरतूद धरण्यापासून प्रस्ताव तयार करणे, त्रुटी दूर करून तो मंजूर करण्यासाठी बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी वेळोवेळी महापालिका आयुक्तांसह सर्व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. त्रुटी दूर करण्यासाठी व प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी, ई-निविदा काढण्यापर्यंत पाठपुरावा केला. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, डॉ. शशीकांत मोरे, अनंत संगमनेरकर, बन्सीलाल पाटील, अशोक पाटील, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here