नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची एकही केस आढळून आली नसून, अनावश्यक अफवा पसरविल्या जात असल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे. कुठल्याही अफवा न पसरविण्याचे आवाहनसुद्धा यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.
काय म्हणाले जिल्हाधिकारी सुरज मांढरे:
“आपल्या जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यू’ची एकही केस अद्यापपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. “
ते पुढे म्हणाले, “अनावश्यक पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच सध्या कोविड युद्धामध्ये उपयोगी ठरणारे प्रोटीनचे मार्ग म्हणजे अंडी आणि चिकन यांच्या वापरावर देखील प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या पदार्थांचा वापर सुरू ठेवावा असे आवाहन मी करीत आहे. तसेच राज्यस्तरीय दूरचित्रवाणी परिषदेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने वरील आवाहन प्रसारित करण्यात आले आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही काळजीचे कारण असल्यास तातडीने अधिकृत माहिती प्रसारित करणेत येईल.”