
नाशिक (प्रतिनिधी): शहरासह जिल्ह्यासाठी आणि घाटप्रदेशाकरिता हवामान खात्याकडून पावसाचा सोमवारी (दि.१९) ऑरेंज तर गुरुवारपर्यंत (दि.२२) ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. गडगडाटी स्वरूपाचा वादळी मान्सूनपूर्व पाऊस दमदार हजेरी लावण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील पाच दिवस शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे; मात्र सोमवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांसह अन्य नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारनंतर पाऊस हजेरी लावू शकतो. रविवारी दिवसभर शहरात उकाडा जाणवत होता. ढगाळ हवामान व मंदावलेल्या वाऱ्यामुळे नागरिक घामाघूम झाले. कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.१अंश सेल्सिअस इतके पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात नोंदविण्यात आले.
एकाच वेळी अरबी समुद्रासह बंगालचा उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागराता १७ ते २०अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान, तिन्हीही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे निर्माण होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि या तिन्ही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता चालू आठवड्यात निर्माण होत असल्याचे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यांतील ८ जिल्ह्यात सोमवारपासून पुढील आठवडाभर तर विदर्भातील ११ जिल्ह्यात ह्या दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चालू आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.