नाशिक (प्रतिनिधी): राज्यात सध्या आकाश कोरडे आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे दुपारचे तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. सोमवारी विदर्भात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सियसची नोंद झाली.
नाशिकला कमाल तापमान ३५.२ तर छत्रपती संभाजीनगरला ३६.२ अंश सेल्सियसची नोंद झाली. राज्यात आगामी ४ ते ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस किमान आणि कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सियसने जास्त राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. उत्तर- पश्चिम महाराष्ट्रात साधारण आणि सरासरीइतकेच तापमान राहणार आहे.
राज्यातील सर्व शहरांमध्ये दिवसाचे तापमान वाढत असले तरीही रात्रीचे तापमान त्या तुलनेत निम्मे किंवा त्यापेक्षाही कमी असल्याचे सोमवारच्या तुलनात्मक आकडेवारीवरून स्पष्ट होते. परिणामी दिवसा उकाडा आणि रात्री थंडी जाणवत आहे. ही तफावत आणि विषम हवामान आणखी तीन दिवस कायम राहील, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.