नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर; हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

नाशिक। दि. २९ जुलै २०२६: नाशिक जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, आज (बुधवार)पासून १ ऑगस्टपर्यंत सलग चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा

जुलै महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही पावसाची मालिका कायम आहे. मंगळवारी दिवसभर कधी उघडीप, कधी उन्हाची चाहूल, तर अधूनमधून हलक्या सरींचा अनुभव नाशिककरांना आला.

मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३१.७ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक शहरात सकाळी साडेआठपर्यंत १०.६ मिलिमीटर, तर त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत आणखी १.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दीक्षांत समारंभ हा ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या वचनबद्धतेचा सोहळा- राज्यपाल जिष्णू देव वर्मा

दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाची आवक सुरू असल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढल्यास परिस्थितीनुसार धरणांमधील विसर्गातही वाढ करण्यात येऊ शकते.

प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी तसेच सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790