नाशिक: अन्न भेसळ, अस्वच्छतेबाबत नागरिक सजग; नाशिक विभागात ऑनलाइन पोर्टलवर १२४ तक्रारी

नाशिक। २९ जुलै २०२६: अन्न भेसळ, अस्वच्छता, मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या ‘एकएफडीए’ (OneFDA) ऑनलाइन तक्रार पोर्टलला नाशिक विभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ जुलै २०२६ पासून कार्यान्वित झालेल्या या पोर्टलवर अवघ्या पंधरा दिवसांत १२४ ऑनलाइन तक्रारींची नोंद झाली असून, त्यापैकी बहुतांश तक्रारींवर तपासणी करून आवश्यक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरबसल्या अन्नाशी संबंधित तक्रारी नोंदविता याव्यात आणि त्यावरील कारवाईची माहिती ऑनलाइन पाहता यावी, यासाठी ‘एकएफडीए’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: त्र्यंबकेश्वरला उभारणार पाच भूकंपीय निरीक्षण केंद्रे - शेखर सिंह

कोणत्या तक्रारी सर्वाधिक?
नाशिक विभागात प्राप्त झालेल्या १२४ तक्रारींमध्ये सर्वाधिक निकृष्ट दर्जाचे पॅकेज्ड अन्न व लेबलिंगमधील त्रुटींच्या २८ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अस्वच्छ उत्पादन व साठवणुकीबाबत १६, मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत १३, दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीबाबत १३, प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या विक्रीबाबत १२, अन्नपदार्थांमध्ये बाह्य घटक आढळल्याच्या १२, हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याबाबत १०, खाद्यतेल व तुपातील भेसळीच्या ३, दिशाभूल करणाऱ्या लेबलच्या २, तर इतर स्वरूपाच्या १५ तक्रारींचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 11 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक नमुने तपासणीसाठी घेतात. त्यानंतर झालेल्या कारवाईची संपूर्ण माहिती तक्रारदाराला पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यापासून अंतिम निपटाऱ्यापर्यंतची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे.

यापूर्वी दूरध्वनी किंवा प्रत्यक्ष कार्यालयात दिलेल्या तक्रारींवरील कारवाईची माहिती मिळविणे कठीण जात होते. मात्र, नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे तक्रारदाराला प्रत्येक टप्प्याची माहिती ऑनलाइन मिळत असल्याने प्रशासनावरील विश्वास वाढत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागरिकांना complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदविता येणार असून, ऑनलाइन तक्रार करताना अडचण आल्यास 1800223365

या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

नागरिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, भेसळयुक्त, निकृष्ट किंवा अस्वच्छ अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत निर्भयपणे तक्रार नोंदवून अन्न सुरक्षा मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने तसेच सहाय्यक आयुक्त (अन्न) ज्ञा.सु. महाले यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790