नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह परिसरात उष्णतेची तीव्रता वाढत असून पुढील पाच दिवस तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. भारत हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने नाशिकसाठी यलो अलर्ट जारी केला असून, हवामान उष्ण व दमट राहील. या कालावधीत वाऱ्याचा वेग सरासरी ताशी १५ ते १८ किमी इतका राहण्याचा अंदाज आहे.
मंगळवारी नाशिकचे कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. यामध्ये १ अंशाची वाढ झाली आहे. तर रात्रीच्या किमान तापमानातही २ अंशांची वाढ झाली आहे, जे नागरिकांच्या अस्वस्थतेत भर घालणारे ठरत आहे.
इगतपुरी येथील भात संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, येत्या काही दिवसांत नाशिकमधील तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशात थेट संपर्क टाळावा, पुरेसे पाणी प्यावे, हलक्या व ढगळ कपड्यांचा वापर करावा, तसेच वृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर काही काळ ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून सूर्यप्रकाशाची तीव्रता पुन्हा वाढत असून, उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहित धरून प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.