नाशिक (प्रतिनिधी): शहर वाहतूक शाखेच्या युनिट १ ते ४ मधील सिग्नल व्यवस्थेमध्ये वाढत्या उन्हाच्या झळांमुळे बदल करण्यात येणार आहे. दुपारच्या वेळेत वाहनचालकांना सिग्नलवर उभे राहणे जिकिरीचे होत असल्याने सिग्नलच्या वेळेत बदल करण्यासह शहरातील ३० सिग्नल हे दुपारी १ ते ४ या दरम्यान, ‘ब्लिंकर्स’ पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून शहराच्या कमाल तापमानाचा आलेख हा चढता राहिलेला आहे.
वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असल्याने सिग्नलचे पालन करणे अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सिग्नल उल्लंघनाचे प्रमाण वाढून वाहतूककोंडीही निर्माण होत असल्याचे वाहतूक शाखेच्या लक्षात आले. सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करत अत्यावश्यक सिग्नल जे नेहमीप्रमाणे सुरू ठेवायचे आहेत याबाबतची यादी दिली.
हे सिग्नल राहणार ‘ब्लिंकर्स’वर:
ड्रीम कॅसल, पेठ नाका, काट्या मारुती चौक, मालेगाव स्टॅण्ड, तारवालानगर, नांदूर नाका, मिर्ची चौक, स्वामीनारायण चौक, आरटीओ कॉर्नर, बाजार समिती चौक, जिजाऊ चौक, खडकाली सिग्नल, पाइपलाइन रोड सिग्नल, कॉलेजरोड (हॉलमार्क चौक), पारिजातनगर, जलतरण तलाव चौक (त्र्यंबकरोड), तिबेटियन चौक सिग्नल, कॅनडा कॉर्नर सिग्नल, रेडक्रॉस सिग्नल, बारदान फाटा चौक सिग्नल, वडाळा रोड सिग्नल (सह्याद्री), सिब्बल सिग्नल, अशोकामार्ग पोलिस चौकी सिग्नल, त्रिमूर्ती चौक, साईनाथनगर, कलानगर, सातपूर महिंद्र चौक, समृद्धी टी-पॉइंट, विहितगाव चौक, जेलरोड पाण्याची टाकी हे सर्व सिग्नल ‘ब्लिंकर्स’वर राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हे सिग्नल नियमितपणे:
त्र्यंबकनाका सिग्नल, गडकरी चौक, उंटवाडी चौक, एबीबी चौक, जेहान चौक, काठे गल्ली, सीबीएस चौक, जुना सीटीबी चौक, जुना गंगापूर नाका, मेहेर चौक, आयटीआय चौक, पपया नर्सरी चौक, पाथर्डी फाटा चौक, विजय-ममता चौक, सम्राट चौक, उपनगर नाका, दत्तमंदिर चौक, बिटको चौक या ठिकाणांचे सिग्नल.