नाशिक (प्रतिनिधी): बडगुजर अँड बडगुजर कंपनीला पालिकेच्या विविध कामांचे १५ टेंडर देत या कंपनीच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात एसीबीच्या गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांना दि. ९ जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान, कागदपत्र देण्यासाठी बडगुजर यांनी १० दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी अंतरिम जामीन मिळवला.
बडगुजर यांच्यासह कंपनीच्या भागीदारांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बडगुजर, त्यांचा भाऊ आणि अन्य भागीदारांची चौकशी करण्यात आली. एसीबीच्या प्रश्नांची उत्तरे बडगुजर यांनी दिलेली नाहीत.
मात्र, त्यांच्या भागीदारांनी चौकशीत कंपनी सुधाकर बडगुजर यांचीच असून सर्व व्यवहार स्वत: बडगुजर बघत असल्याचा जबाब दिला आहे. कंपनीकडून अधिकृतपणे बिले काढण्यात आली असून यासंबंधी कागदपत्रे मिळवल्यानंतर बोलणार असल्याचे सांगत त्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना अंतरिम जामीन मिळाल्याने अटकेच्या भीतीपोटी जामीन मिळवल्याची चर्चा सुरू झाली आहे.