नाशिक: इनोव्हा कारमधून ३८ लाखांचा ३७८ किलो गांजा जप्त; पोलिसांनी उधळला तस्करीचा डाव

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातून शहराच्या दिशेने एका फॅमिली कारमधून गांजाची होणारी वाहतूक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने सापळा रचून रोखली. चांदोरी चौफुली परिसरात संशयास्पद इनोव्हा कारने पथकाला हुलकावणी देऊन पळ काढला, मात्र, पोलिसांनी शासकीय वाहनाने कारचा पाठलाग सुरूच ठेवला.

अंधाराचा फायदा घेत कार नजरेआड झाली होती. पथकाने शोध घेतला असता शहरातील पेठरोडवर ही कार पोलिसांना बेवारसरीत्या सापडली. या कारमधून सुमारे ३७८ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना फॅमिली कारमधून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना माहिती कळवून पथक सज्ज करीत छत्रपती संभाजीनगर महामार्ग गाठले.

चांदोरी चौफुलीजवळ पथकाने साध्या वेशामध्ये सापळा लावला. यावेळी गांजाची तस्करी करणारी संशयास्पद इनोव्हा कार (एम. एच. २० सीयू ७०७०) भरधाव चौफुलीवर आली. त्यांना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी कार वाऱ्याच्या वेगाने शहराच्या दिशेने पाठवली.

यावेळी पथकानेही कारचा पाठलाग सुरू केला; मात्र इनोव्हा आणि शासकीय वाहनाचा वेगामध्ये अंतर पडल्यामुळे गांजाची तस्करी करणारी कार पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यातून रात्रीच्या अंधारात गायब झाली; मात्र, पोलिसांनी तपासाचे कौशल्य वापरून या मार्गावरील विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळच्या एका बिअर बारच्या आवारात इनोव्हा कार बेवारसपणे उभी केलेली आढळली.

पोलिसांनी कार मालकासह कार चालकाविरुद्ध अमलीपदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील फरार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

१२ गोण्यांमध्ये १८९ पाकिटे:
उग्र वास असलेल्या गांजाची १८९ पाकिटे १२ प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून अवैधरीत्या विक्रीसाठी इनोव्हा कारमधून वाहून नेली जात होती. सुमारे ३७ लाख ८३ हजार २५० रुपये किमतीचा ३८७ किलो ३२५ ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच इनोव्हा कारसुद्धा जप्त केली आहे. एकूण ६२ लाख ९० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790