
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव, निफाड, संभाजीनगर या रस्त्यांसाठी केलेल्या बांधकामाच्या नुकसानभरपाईपोटी मिळणाऱ्या मोबदल्याच्या रकमेतून १२ कोटी ६१ लाख ६८ हजार रुपये बनावट दस्ताऐवजाद्वारे परस्पर लांबविणाऱ्या ठगबाजाच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने राजस्थानच्या सिकरमधून मुसक्या आवळल्या. शकुर अहमद जमालुद्दीन सैय्यद (६०, रा. धामणकर चौक, तिडके कॉलनी) असे अटक केलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या एका कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव, निफाड आणि संभाजीनगर या रस्त्यांचे बांधकाम केले होते. बांधकामाच्या नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या मोबदल्याच्या रकमेपैकी १२ कोटी ६१ लाख ६८ हजार रुपयांचे बनावट दस्तऐवज तयार करून ते बँकेत सादर केले. त्यानंतर ही रक्कम संशयित शकुर अहमद व इतरांनी त्यांच्या एका कंपनीच्या बँक खात्यात परस्पर वर्ग करून ठाकूर यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलिस व गुंडाविरोधी पथकाकडून केला जात होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी तपासाला वेग दिला.
गुंडाविरोधी पथक राजस्थानात गेले. बुधवारी (दि.२) सिकर जिल्ह्यात मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून संशयित आरोपी शकुरला ताब्यात घेतले. पथकाने पुढील कारवाईसाठी त्यास नाशिकमध्ये आणून नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केले आहे.
दोन दिवस सिकरमध्ये पोलिसांनी रचला सापळा:
मुख्य संशयित शकुर याचा ठावठिकाणा मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये असल्याचे प्रथमदर्शनी समजले. पथकाने तेथे सापळा रचण्याच्या हालचाली सुरू करताच त्याने इंदूरमधून थेट राज्यस्थानमधील सिकर जिल्ह्यात आश्रय घेतल्याचे समोर आले. ज्ञानेश्वर मोहिते यांनी याबाबतची माहिती उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना दिली.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी पथकाला मार्गदर्शन करत राजस्थानात सापळा रचताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या. यानंतर मोहिते यांनी मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, भूषण सोनवणे, कल्पेश जाधव, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनिता कवडे यांचे पथक सज्ज करून राजस्थान गाठले. तेथे सापळा रचून शिताफीने शकुरला जाळ्यात घेतले.