नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
१० हजार जणांवर कारवाई; थकबाकी १२५ कोटी
नाशिक (प्रतिनिधी): घरपट्टी वसुलीत नवीन उच्चांक गाठला जात असताना दुसरीकडे पाणीपट्टीची थकबाकी १२५ कोटींच्या घरात असल्यामुळे १० हजार बड्या थकबाकीदारांची जोडणी खंडित करण्याचा पवित्रा महापालिकेच्या विविध कर विभागांनी घेतला आहे.
दरम्यान, यापूर्वी ज्यांच्या जोडण्या खंडित केल्या, त्यांनी थकबाकी भरली नसल्यामुळे त्यांना पाणीपुरवठा कसा होतो याची पाहणी केल्यानंतर परस्पर जोडणी केल्याचे आढळले. त्यामुळे थकबाकी न भरता परस्पर जोडणी केल्याचे आढळल्यास संबंधित नळग्राहकाविरोधात गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
महापालिकेत सध्या मार्च एण्डचा फिव्हर असून जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, त्यानंतर स्वच्छता अभियान, मराठा समाज आरक्षणासाठी झपेरिअल डाटा संकलनाचे काम यामुळे कर बसुलीकडे दुर्लक्ष झाले, मात्र आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम दोन महिने बाकी असल्यामुळे थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या दरम्यान १७० कोटींची घरपट्टी वसूल झाली आहे. घरपट्टी वसुलीची कामगिरी दमदार आहे. मात्र, पाणीपट्टीची जेमतेम ३८ कोटींची वसुली झाली आहे.
थकबाकीकडे पाठ:
पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित केल्यानंतर त्यांनी पैसे भरून पाणीपुरवठा सुरळीत करून घेणे अपेक्षित आहे. मात्र नळ जोडणी खंडित केल्यानंतर थकबाकी कमी झालेली नाही. त्यामुळे ज्यांचा पाणीपुरवठा खंडित झाला ते नेमके करतात काय याचा शोध घेतल्यानंतर काही ठिकाणी परस्पर नळजोडणी केल्याचे आढळून आले. दरम्यान, आता खंडित केलेल्या नळजोडण्या परस्पर सुरू केल्याचे आढळल्यास संबंधितांवर पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.