नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही https://voters.eci.gov.in/ या लिंकवरून 9 डिसेंबर पर्यंत नोंदणी करता येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यात एप्रिल २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांसाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊनही मतदार नोंदणीचे काम केले आहे.
आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल. त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन केंद्रांवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने केले आहे.
अशी करावी नवमतदार नोंदणी किंवा दुरुस्ती:
नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूक विषयक सुविधा मिळविण्यासाठी voter helpline app उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले अॅप डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अॅपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.
तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी कळविले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790