HomeAd

नाशिक: २० लाखांच्या खंडणीसाठी मित्रांकडूनच अपहरणाचा कट; आरोपींना अटक !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): उद्योग भवन परिसरातील प्रकाशनगरमधून अल्पवयीन अर्जुन जोगिंदर गुप्ता (१७) यांची बंदूक व चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि. २७) रात्री ११ च्या सुमारास घडली.

आरोपींनी मुलाच्या कुटुंबीयांकडे २० लाखांची खंडणी मागत मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सिन्नर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोघा आरोपींना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून अपहृत मुलाची सुटका केली.

ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक विधिसंघर्षित बालक आहे. अल्प परिश्रमात पैसे मिळवण्यासाठी अर्जुनच्या मित्रांनीच अपहरणाचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

अर्जुन गुप्ता व गावाकडील मित्र करण चक्रधारी यांनी प्रकाशनगरमध्ये रुम भाड्याने घेतली होती. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास सहा आरोपींनी रुममध्ये घुसून दोघांना बंदूक व चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. दोघांचेही हातपाय बांधत तोंडास चिकट टेप गुंडाळला. आरोपींनी करणला बाथरूममध्ये कोंडत अर्जुनला पळवून नेले.

त्यानंतर आरोपींनी अर्जुनच्या मोबाइलवरून त्याच्या मोठ्या भावास फोन करून तुझ्या भावाचे आम्ही अपहरण केले असल्याचे सांगत सुटकेसाठी २० लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही तर मारून टाकण्याची धमकी दिली. अर्जुनच्या कुटुंबीयांनी मुलाच्या अपहरणाची माहिती सिन्नर पोलिस ठाण्यात देताच पोलिसांनी घटनास्थळी जात खात्री केली.

तेथे अर्जुनचा मित्र करण बाथरूममध्ये आढळला. त्याच्याकडून माहिती घेत पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी अर्जुनच्या मित्रांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मित्र निखिलेश रणजित रावत व अनिस रईस मोहम्मद दोघे घरी नसल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी निखिलेशचा शोध घेत विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्याला विश्वासात घेत त्याने घडलेला प्रकार सांगितला. गौरव चौधरी, जाफर मोमीन, साहिल तायडे, अनिस मोहम्मद, गौरव चौधरी व निखिलेश यांनी अर्जुनला शंकरनगर परिसरात जाफर मोमीन याच्या भंगारच्या गोदामात ठेवल्याची माहिती मिळाली. हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड, मंगलसिंग सोनवणे यांनी गोदामाच्या शटरचे लॉक तोडत आत प्रवेश केला.

त्यावेळी अर्जुनचे हातपाय बांधून व तोंडात बोळा कोंबून डोक्यापासून ते गळ्यापर्यंत चिकटपट्टीने चिकटवलेले दिसले. अर्जुनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसले. त्यास तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी जाफर मोमीन, साहिल तायडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या साथीदारांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे निरीक्षक कुटे यांनी सांगितले. अपहरणानंतर सहा तासांच्या आत शोध घेत मुलाची सुटका करत आरोपींना अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790