महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

नाशिक। दि. २८ जुलै २०२६: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात घेतलेले ज्ञान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते तेव्हा आरोग्य शिक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरते. दीक्षांत समारंभ पदवी प्रदान सोहळा नाही, तर ज्ञान, परिश्रम आणि मानवसेवेच्या आजीवन वचनबद्धतेचा उत्सव आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ आज सकाळी विद्यापीठात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल श्री. वर्मा यांनी पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कर्तव्याची शपथ दिली.
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमच्या सेवाकार्यामुळे रुग्णाचे दुःख कमी होऊन गरजू लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होईल. आरोग्य क्षेत्र व्यावसायिक झाल्याने समाज तुमच्याकडे विश्वास आणि आशेने पाहणार आहे. तुम्ही दिलेली औषधे रुग्ण कदाचित विसरेल. मात्र, तुमची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा तो कधीही विसरणार नाही.
विकसित भारत २०४७ ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य व्यावसायिक केवळ वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे पुरेसे नाही. त्यासाठी तंत्रज्ञानाचे ज्ञान, संशोधनाची दृष्टी, नैतिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारीही असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या मूलभूत बाबींना बळकटी देत आहे ही समाधानाची बाब आहे. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन आणि विद्यापीठ प्रशासन अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब कुलगुरूंच्या अहवालात दिसून येते. पेपरलेस प्रशासन, डिजिटल प्रमाणपत्रे, ॲकेडॅमिक बँक ऑफ क्रेडीटस (Academic Bank of Credits) आणि तंत्रज्ञानाधारित सेवा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाची सुशासन आणि कार्यक्षम सार्वजनिक सेवा देण्याची बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले.
संशोधन आणि नवोपक्रमावर दिला जाणारा भर कौतुकास्पद आहे. संशोधन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य, शिक्षक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्राची स्थापना यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत होईल. संशोधनातून ज्ञानाची वाढ होते आणि हेच संशोधन आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन घडवून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले.
आरोग्य शिक्षणातील गुणवत्ता ही थेट समाजातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. जनुकीय संशोधन, नवजात शिशू तपासणी, आदिवासी आरोग्य, थॅलेसेमिया प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण आणि इतर स्थानिक आरोग्यविषयक समस्यांवर केले जाणारे संशोधन हे राज्यातील जनतेच्या वास्तविक आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची बांधिलकी दर्शवते.
शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कधीही शिकणे थांबवू नये. वैद्यकीय विज्ञान दररोज विकसित होत आहे आणि आजीवन शिक्षण ही प्रत्येक यशस्वी आरोग्य व्यावसायिकाची ओळख आहे. नैतिकतेची सर्वोच्च मूल्ये जपावीत. नैतिक आचरणाशिवाय केवळ व्यावसायिक कौशल्य समाजाचा विश्वास संपादन करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नवकल्पना ही प्रभावी साधने आहेत; मात्र उपचाराची सुरुवात सहानुभूतीतून होते, असेही राज्यपाल श्री. वर्मा यांनी सांगितले.
डॉ. पंढरे म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने चांगली कामगिरी बजावली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. विद्यार्थ्यांनी आता अभ्यासातून समाजसेवेकडे वाटचाल करताना गरिबांची सेवा करावी. गुणवत्ता हे एकमेव साधन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. त्यांनी मोठे ध्येय ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, १९९८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. संशोधन, नावीण्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा विद्यापीठातर्फे स्वीकार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सरदेशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. स्वप्नील तोरणे यांनी मानपत्राचे वाचन तसेच सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपस्थित होते.
डॉ. सदानंद सरदेशमुख यांना डी. लिट.:
विद्यापीठातर्फे डॉ. सदानंद सरदेशमुख यांना त्यांच्या सेवेबद्दल डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. सरदेशमुख यांनी आयुर्वेद विद्याशाखेतील शिक्षण, सेवा आणि मानव कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुणे विद्यापीठातून आयुर्वेदातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळविणारे ते पहिले पदवीधारक आहेत. साहित्य, शिक्षण, संशोधन, आरोग्य सेवा आणि वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक सेवेसाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यांनी १९६७ पासून आयुर्वेद सल्लागार म्हणून काम सुरू केले. १९९४ मध्ये एकात्मिक कर्करोग संशोधन प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना लाभ झाला आहे. याबरोबरच एचआयव्ही एड्स, संधीवात, महिला व बालकल्याण, हाडांच्या उपचारावर त्यांनी भरीव संशोधन केले आहे. आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान करीत सन्मानित केले आहे.
१२ हजार २६३ विद्यार्थ्यांना पदवी:
या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२ हजार २६३ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच २० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी), तर विविध विद्याशाखेतील ९९ विद्यार्थ्यांना १४६ सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दीक्षांत समारंभात वैद्यकीय विद्याशाखा पदवीचे ६६२१, दंत विद्याशाखा पदवीचे २१९२, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवीचे १३३, होमिओपॅथी विद्याशाखा पदवीचे ४०५, नर्सिंग विद्याशाखा पदवीचे ७३२, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी पदवीचे ३६९, पदव्युत्त वैद्यकीय शाखेचे २०७, दंत, बी. एससी. पॅरामेडिकलचे ३१५, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीचे १२७२, अलाईडच्या १७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
![]()


