नाशिक (प्रतिनिधी): पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे होणारी वृक्ष लागवड आता चक्क पावसाळ्यानंतर होणार असून दोन कोटी ३६ लाख ४२ हजार ३६६ रुपये खर्चून दहा हजार ५०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
पावसाळ्यामध्ये झाडे जगण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आता झाडे लावण्याचा अभिनव प्रयोग करत असल्याचा दावा उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी केला असून जितकी झाडे जगतील तितकेच पैसे अदा केले जातील असेही स्पष्ट केले.
दरवर्षी पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी निविदा काढून साधारण तीन ते चार फुटांची तयार रोपे लागवड करून ठेकेदाराला संगोपनाचे काम दिले जाते. मात्र २०२३-२४ या वर्षात पावसाळा संपल्यानंतर उद्यान विभागाला जाग आली.
त्या मागचे कारण सांगताना उद्यान अधीक्षक भदाणे यांनी सांगितले की, पावसाळ्यानंतर जमिनीत पाणी मुरलेले असते. मातीचे चांगल्या पद्धतीने शुद्धीकरण झाल्यामुळे अशा शुद्ध मातीत झाडे जगण्याचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उद्यान विभागाकडून वृक्षांचे रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.