नाशिक: चहा विक्रेत्या महिलेची पोत खेचणाऱ्याला काही तासात अटक; चैनस्नॅचर सराईत गुन्हेगार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर येथे चहाच्या टपरीवर सिगारेट घेण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने टपरीचालक महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची चैन खेचून पोबारा केल्याचा प्रकार घडला.

घटनेची माहिती समजताच गस्तीवर असलेल्या इंदिरानगर पोलिसांच्या पथकाने काही तासातच सोनसाखळी खेचणार्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अक्षय एकनाथ गुळवे (२८, रा. गामणे मैदानासमोर, म्हाडा वसाहत, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पुष्पा यादव सावंत (रा. तुळजाभवानी रो हाऊस, गामणे मळा, वासननगर) यांच्या फिर्यादीनुसार, सदरची घटना गेल्या मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

त्यांचे गौळाणे रोडवरील एसएसके क्लबच्या जवळ चहा, वडापावची टपरी आहे. संशयित अक्षय सिगारेट घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या टपरीवर आला होता. त्यावेळी संधी साधून त्याने पुष्पा सावंत यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची चैन बळजबरीने खेचून पोबारा केला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आल्यानंतर तात्काळ गस्तीपथकांना अलर्ट करण्यात आले. संशयिताचे वर्णनही गस्तीपथकांना देण्यात आली.

त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ सोनवणे हे म्हाडा वसाहत परिसरात गस्तीवर असताना, संशयिताच्या वर्णनावरून त्यांनी वसाहतीच्या मैदानावर संशयित अक्षय याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता चोरीचा मुद्देमाल सापडला. संशयित अक्षय यास अटक करून इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

याच्याविरोधात यापूर्वीही चोरीचे गुन्हे असून, गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत. संशयित अक्षय यास न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (ता. १४) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790