नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने घोटीतील सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून सोमवारी (ता. ४) सराईत दुचाकी चोरटा गुरुदेव काळू खतेले (वय २६, रा. खडकेद, ता. इगतपुरी) यास ताब्यात घेतले.
त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गोंदे परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयित गुरूदेव खतेले याने साथीदार शंकर एकनाथ गांगड (रा. उभाडे, ता. इगतपुरी) याच्या मदतीने सिन्नर, वाडीवऱ्हे, नाशिक शहरातील अंबड, आडगाव परिसरातून एकूण १० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याजवळून ९ लाखांच्या चोरीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. गुरुदेव खतेले याच्याविरोधात यापूर्वी खून, दरोडा तयारी, घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी, असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, हवालदार नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, प्रवीण सानप, किशोर खराटे, संदीप नागपुरे, पोलिस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, शिवाजी शिंदे, योगेश यंदे, कर्मचारी म्हसदे यांनी केली.