नाशिक: पिशवीतील डब्यालाच ढाल बनवली अन् बिबट्याशी केले दोन हात

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असतात. काही दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात बिबट हल्ल्याची घटना घडली होती.

अशातच पुन्हा सिन्नर तालुक्यातीलच जोगलटेंभी येथे बिबट हल्ल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेने धाडस दाखवत पिशवीतील डब्ब्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले आहे.

नाशिकसह परिसरात बिबट्याचे दर्शन होत असते. तर निफाड, सिन्नर भागात बिबट्या थेट शेतात, घराजवळ संचार करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असते. काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याने हल्ला चढवल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

अशातच सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे काळे वस्तीजवळ शेतातील काम उरकून घरी परतणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. मात्र, महिलने प्रसंगावधान राखत आपल्या सोबत असलेल्या विळा, खुरपे आणि जेवणाच्या डब्याच्या पिशवीने प्रतिकार करत स्वत:चा बचाव केला. या हल्ल्यात महिलेच्या हाताला आणि मानेला बिबट्याचे पंजे लागल्याने त्या जखमी झाल्या.

जोगलटेंभी येथील संगीता लक्ष्मण काळे या शेतकरी महिला मंगळवारी आपल्या शेतात निंदणी, खुरपणीसाठी गेल्या होत्या. शेतातील काम उरकून आणि जेवण करुन त्या दुपारच्या सुमारास घरी परतत होत्या. लक्ष्मण त्र्यंबक काळे यांच्या शेतातील राहत्या घराजवळ त्या आल्या असता बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

अचानक हल्ला झाल्याने संगीता या गडबडून गेल्या. मात्र, त्यांनी स्वत:ला सावरत प्रसंगावधान राखले. यावेळी त्यांनी आपल्या हातात असलेली विळा-खुरपे आणि जेवणाच्या डब्याची कापडाची पिशवी भिरभिर फिरवत स्वतः चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कापडी पिशवी बिबट्याच्या जबड्यात आली.

त्यानंतर संगिता यांनी बिबट्याला ढकलत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रस्त्याने जाणारे सुदाम कमोद यांनी महिलेचा ओरडण्याचा आवाज कानावर पडताच मदतीसाठी धाव घेतली. सुुदाम यांना बघून बिबट्याने शेजारील उसाच्या शेतात धुम ठोकली. मात्र, या हल्ल्यात संगीता यांच्या दोन्ही हाताला आणि मानेला बिबट्याच्या पंजाने खरचटल्याने त्यांना जखमा झाल्या. त्यावर काळे यांनी संगिता यांना तात्काळ उपचारासाठी नायगाव येथील दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाला कळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान दिवसाढवळ्या बिबट्याने महिलेवर हल्ला करुन जखमी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे

महिलेच्या धाडसाचे कौतुक:
दरम्यान, शेतातील काम दुपारी उरकल्यानंतर त्या घरी परतत असताना अचानक बिबट्या समोर आला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून तसेच त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे त्यांचे बिबट्याच्या हल्ल्यातून प्राण वाचले. प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या हातातील कापडी पिशवी फिरवत बिबट्यावर प्रतिकार केल्याने बिबट्याच्या तावडीतून त्या वाचल्या. त्यांमुळे संगिता यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत असून रात्रीच्यावेळी बिबट्या शेतकऱ्यांना दर्शन देत असतो. त्यामुळे रात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. आता दिवसाढवळ्या बिबट्याने महिलेवर हल्ला करुन जखमी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790