कुंभमेळा २०२७: त्र्यंबकेश्वरसाठी ११०० कोटी रुपयांचा विकास आराखडा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक (प्रतिनिधी): देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वर परिसराची नैसर्गिक रचना सुंदर आहे. या परिसराच्या विकासासठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.

हे ही वाचा:  आगामी चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज ; 'या' १९ जिल्ह्यांत यलो अलर्ट

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील कामे कालबद्धरितीने पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे करताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग होईल, विद्युत वाहने उपयोगात येतील, असे नियोजन करावे. त्यासोबत स्थानिक नागरिकांना अधिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था करावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण:
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच करण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यामुळे कुंभामेळ्यासंबंधी कामांना कायदेशीर चौकट प्राप्त होईल आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येईल. आयोजनादरम्यान विविध सुविधांचे उत्तम व्यवस्थापन होण्यासाठी हे गरजेचे आहे.

हे ही वाचा:  नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे ७ एप्रिलला जनता दरबारचे आयोजन

गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा ११०० कोटी रुपयांचा असून त्या अंतर्गत या स्थानाचे अध्यात्मिक व पर्यटनाच्यादृष्टीने महत्व लक्षात घेवून विकासकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790