
नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होणारी जीआयएस (ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टिम) सिस्टिम अंतिम करावी. ही यंत्रणा अद्ययावत, वापरण्यास सुलभ आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली असावी, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, ओमकार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जीआयएसचा डाटा संरक्षित करावा
आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जीआयएस यंत्रणेचा वापर करावा, असे निर्देश यापूर्वी विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार आजच्या बैठकीत महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सादरीकरण केले. त्यात काही सुधारणा करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले की, जीआयएस यंत्रणेच्या वापरासाठी निश्चित अशी कार्यपद्धती तयार करावी. त्यात सर्व विभागांचा समावेश असावा. त्यावर उपलब्ध होणारा डाटा कायमस्वरूपी संरक्षित करून ठेवावा. सीसीटीव्ही कार्यान्वित करताना व्हिडिओ विश्लेषकाचा वापर करावा.
वाहनतळ अत्याधुनिक आणि सुसज्ज असावीत:
आगामी काळातील नियोजन पाहता वाहनतळ अत्याधुनिक आणि सुसज्ज असावीत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकेने अभ्यास करून नियोजन करावे. कुंभमेळ्यासह सर्व कामे गुणवत्तापूर्ण असतील याची दक्षता प्रत्येक विभागाने घ्यावी. गोदावरी नदी पात्रातील प्रदूषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पात्राची नियमित पाहणी करावी. तसेच नदी पात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी. याबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल.
वरिष्ठ अधिकारी देणार प्रयागराजला भेट:
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे सुरू झालेल्या कुंभमेळ्यातील पायाभूत सोयीसुविधा, भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांच्या पाहणीसाठी जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी लवकरच प्रयागराजचा दौरा करतील. या दौऱ्यातून प्रयागराज जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा यांची माहिती होईल. त्याचा उपयोग आगामी कुंभमेळ्यासाठी करता येईल, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी जीआयएस यंत्रणेविषयी सविस्तर माहिती दिली.