नाशिक (प्रतिनिधी): शेअर्स मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक नफा मिळून देण्याचे आमिष देत ऑनलाइन गुंतवणूक करण्यास भाग पाडत ७ गुंतवणूकदारांना तब्बल एक कोटी ५७ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी आणि सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, १५ जून ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत सोशल मीडियावर एक लिंक पाठवली. शेअर्स मार्केटची ऑनलाइन माहिती दिली. संशयितांनी विविध नामांकित कंपनीचे आयपीओ आणि पोर्टफोलिओ दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. यात शेअर्स ट्रेडिंग आणि आयपीओत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दिले. फिर्यादीसह चार गुंतवणूकदारांनी ऑनलाइन ७१ लाख ४९ हजारांची गुंतवणूक केली. नफा बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले असता संशयिताने आणखी काही दिवस पैसे न काढता मार्केट वाढेल असे सांगत वेळ काढून नेत संपर्क कमी केला.
अशाचप्रकारे दुसऱ्या गुन्ह्यात स्टॉक ब्रोकर असल्याचे सांगत ऑनलाइन स्टॉक मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, अपर ट्रेडिंग, आयपीओ ट्रेडिंग करण्यास सांगत दोघा गुंतवणूकदारांना २९ लाख ८ हजारांना गंडा घातला. वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहे.