नाशिक: कुंभमेळ्याच्या आराखड्यात स्थानिक गरजा लक्षात घ्या: मुख्य सचिव सुजाता सौनिक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, नियोजित साधूग्राम, नागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

सन २०२७-२८ या वर्षात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासंदर्भात मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभाग- १ चे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, नगरविकास विभाग- २ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामे, साधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्था, वाहनतळ उभारणे, नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, परिसर सुशोभीकरण, गोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धन, शुद्धीकरण व सुशोभीकरण, ग्रीन झोन, गर्दीचे सनियंत्रण, आरोग्य तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यात, सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावे, या कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, जेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईल, अशा सूचनाही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790