नाशिक। दि. ३० जुलै २०२६: नाशिक जिल्ह्याच्या लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षमतेला नवी गती देण्यासाठी निफाड येथे प्रस्तावित मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) विकसित करण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जेएनपीटीचे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
बैठकीत एमएमएलपी हा केवळ आयात-निर्यात (EXIM) मालवाहतुकीसाठीच नव्हे, तर एकात्मिक देशांतर्गत लॉजिस्टिक्स पार्क म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील वाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
प्रस्तावित निफाड ड्राय पोर्ट हे नाशिक-चेन्नई महामार्ग, नाशिक रिंगरोड, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि रेल्वे मार्गाशी जोडलेले असल्याने बहु-पद्धती (मल्टी-मॉडेल) कनेक्टिव्हिटीचा मोठा लाभ मिळणार असून, व्यापार व औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
कृषी निर्यात वाढविण्यासाठी लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समित्या ड्राय पोर्टशी जोडण्याचा तसेच पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनाही या प्रकल्पाशी जोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला. याशिवाय, केंद्र शासनाच्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचे निफाड ड्राय पोर्टशी एकत्रीकरण करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे साठवणुकीच्या समस्या कमी होऊन अन्नधान्य पुरवठा साखळी अधिक सक्षम होईल आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना थेट लाभ मिळेल.
जिल्ह्यातील उद्योग व निर्यातदारांसाठी निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी जिल्ह्याच्या आर्थिक विकास चमूला जेएनपीटीच्या मुख्य वाहतूक कार्यालयाशी जोडण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांनी दिली. तसेच, ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा निर्यात प्रोत्साहन बैठकीत जेएनपीटी प्रमुख भागधारक म्हणून सहभागी होणार असल्याचेही बैठकीत जाहीर करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, बहु-पद्धती कनेक्टिव्हिटी आणि जेएनपीटीच्या सहकार्यामुळे निफाड येथील प्रस्तावित मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क नाशिकच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल. या प्रकल्पामुळे कृषी निर्यात, उद्योग, व्यापार आणि रोजगाराला मोठी चालना मिळून नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय लॉजिस्टिक्स आणि निर्यात नकाशावर महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. असे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहे.
![]()


