नाशिक: प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत- डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२५: आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार साडे पाच हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मान्यता मिळालेली सर्व कामे एकमेकांशी समन्वय साधून जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रस्त्यांची कामे करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग, पोलिस विभाग व ईतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवणे अत्यावश्यक आहे. कामे विहित मुदतीत करीत असतांना कामाच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे. रस्त्यांची कामे करतांना विद्युत खांब, झाडे, पाईपलाईन आदी इतर ठिकाणी स्थलांतरीत करतांना संबंधित विभागाची परवानगी मिळणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी. नाशिक-त्र्यंबकेश्वर सहापदरी रस्ता तयार करतांना दोन्ही बाजुंनी पादचारी मार्गाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

नाशिक महानगरपालिका व सर्व संबंधित यंत्रणांनी प्राप्त प्रशासकीय मान्यतेनुसार मलनिस्सारण प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, सी.सी.टिव्ही व ऑप्टीकल फायबर, अग्नीशमन यंत्रणा या कामांना प्राधान्य द्यावे. साधुग्राम आराखड्यात कुंभकाळात भाविकांसाठी प्रदर्शने, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करावे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने ओझर विमानतळ विस्तारीकरण आराखड्यातील अधिक कालावधी लागणारे कामे प्राधान्याने सुरू करण्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्या.

जलसंपदा विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या घाटांची कामे तातडीने सुरू करावीत. पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोध्दाराची कामे प्राधान्याने सुरू करावीत. कुंभमेळा काळात गोदावरी नदी सतत प्रवाहित राहील यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजन करावे. यासाठी पाणी प्रवाहाचे नकाशे, प्रवाहाची दिशा यांचे अवलोकन करावे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नाशिक व अहिल्यानगर जिल्हृयातील बसस्थानक लगतच्या रिकाम्या जागांचा उपयोग पार्किंसाठी करण्यासाठी नियोजन करावे. यासोबतच कुंभमेळा काळात वाहनचालक व वाहक यांच्या रहिवासाच्या दृष्टीने परिसरातील मंगल कार्यालये व सभागृहे यांची माहिती सादर करावी. महावितरण विभागाने ज्या कामांना एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे ती कामे सुरू करावीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

सर्व विभागांनी आपला अंतिम आरखडा सादर करण्यासाठी नियोजन करावे. कुंभमेळा दृष्टीने येणारे भाविक व नागरिकांच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक मोबाईल ॲपसाठी सूक्ष्म बाबींचा विचार करून सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा तपशील त्वरीत सादर करावा. यासाठी विभागांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून कार्यालयासाठी व नागरिकांसाठी तपशील तयार करावा. सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येण्यासारख्या कामांची यादीही प्रत्येक विभागाने सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळा दृष्टीने ग्रामीण व शहरी भागातील वाहतुक नियोजन आराखडा सादर करावा. कुंभमेळा काळात भाविकांच्या सोयीसाठी वाहतुक नियोजनाची माहितीपर डिझाईन तयार करण्याच्या सूचना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या. यावेळी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत कुंभमेळा दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

यावेळी सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त स्मिता झगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोज डोकचौळे, सहसंचालक लेखा व कोषागारे बाबुलाल पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790