कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

मुंबई/नाशिक। दि. २३ एप्रिल २०२६: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मुंबईत नुकतीच उच्चस्तरीय कार्यशाळा पार पडली. या बैठकीत राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाला प्रशासनाचा कणा मानत कुंभमेळा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा दृष्टिकोन मांडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही उच्चस्तरीय चर्चा सुरू असून कुंभ २०२७ हा देशातील सर्वात तंत्रज्ञान-सक्षम कुंभमेळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या कार्यशाळेला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, आयजी राजेश प्रधान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, एसपी (वायरलेस) राजा रामास्वामी, नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, महा IT सीईओ संजय काटकर, आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रांदिवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तसेच मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एमआयटी मीडिया लॅब, भाषिनी, सोकेट.एआय, अद्या.एआय यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांचे तज्ज्ञही या चर्चेत सहभागी झाले. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी एआयचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो, यावर सखोल चर्चा झाली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने ‘कुंभ एआय स्टॅक’ ही संकल्पना मांडली असून, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाईल नेटवर्कमधील माहितीचे विश्लेषण करून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

नाशिक शहरात सध्या सुमारे १३०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून त्यात आणखी ४००० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. यासोबतच स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणीय सेन्सर्स यांसारखी पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहे. कुंभमेळ्यासाठी या सर्व यंत्रणांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

भाविकांसाठी ‘कुंभदूत’ हा एआय आधारित डिजिटल सहाय्यक विकसित करण्यात येत असून, साध्या मोबाईल फोनपासून स्मार्टफोनपर्यंत सर्वांसाठी तो उपलब्ध असेल. व्हॉट्सॲप, आयव्हीआर, मोबाईल ॲप आणि सार्वजनिक घोषणांद्वारे भाविकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी कुंभमेळ्याचे व्यवस्थापन ‘प्रतिक्रिया-आधारित’ (रिऍक्टिव ) न राहता ‘भविष्यवेधी’ (प्रेडिक्टिव ) करण्यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गर्दी, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणी आधीच ओळखून उपाययोजना करण्याची क्षमता एआय प्रणालीत असेल.

तसेच ‘कुंभ एआय सॅन्डबॉक्स’च्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान उपायांची चाचणी प्रत्यक्ष मेळ्यापूर्वी घेण्यात येणार आहे.

२०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून, एका दिवशी २.५ कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही प्रमुख स्थळे ३१ किलोमीटर अंतरावर असून १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ या कालावधीत हा मेळा पार पडणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790