सिंहस्थ कुंभमेळा: यंत्रणांनी गतीने कामे मार्गी लावावीत- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२५: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ज्या कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्या कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्या आहेत, त्यांनी कामांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पार पाडाव्यात. तसेच इतर यंत्रणांनीही ही प्रक्रिया गतीने करुन कामे वेळेत मार्गी लागतील, असे नियोजन करण्याच्या सूचना नाशिक –त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कामांच्या नियोजन आणि सद्यस्थितीचा आढावा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

यावेळी डॉ. गेडाम आणि श्री. सिंह यांनी महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा या महत्वाच्या विभागांसह इतर विभागांनी सुचविलेली कामे, त्यांची सद्यस्थिती, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळालेली कामे, निविदा प्रसिद्ध झालेल्या कामांची माहिती, प्रत्यक्ष सुरूवात झालेली कामे आदींबाबत तपशीलवार माहिती घेतली.

🔎 हे वाचलं का?:  'एअर शो'ला जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा… गंगापूररोडवरील वाहतूक मार्गात आज (दि.२३) बदल !

मागील सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी केलेल्या उपाययोजना, प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे नुकताच पार पडलेल्या कुंभमेळ्यात केलेल्या विविध उपाययोजना आदी लक्षात घेऊन सध्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यावर आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रत्येक कामांचे मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे नियंत्रण राहणार आहे. प्रत्येक कामांचा तपशील यावर असणार आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक बाबींवर संबंधित विभागाने सर्वंकष विचार करुनच त्यांनी सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे कार्यवाही करावयाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठीची वाहतूक व्यवस्था, संत महंतासाठीची निवास व्यवस्था, साधुग्राम, तेथील सोईसुविधा, कुंभमेळा कालावधीत कार्यरत विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांची व्यवस्था, वाहनमुक्त क्षेत्रातील गर्दी नियोजन, अत्यावश्यक सोईसुविधांची उपलब्धता, कायदा व सुव्यवस्था यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही आदींबाबत यावेळी तपशीलवार चर्चा झाली. प्रत्येक यंत्रणेने अधिक गतीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी डॉ. गेडाम यांनी दिल्या. यावेळी सादरीकरणाद्वारे विविध विभाग आणि यंत्रणानिहाय कामांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790