नाशिकमध्ये आजपासून तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’; प्रवेश विनामूल्य, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 पासून कुंभ भक्ती संगमास प्रारंभ होत आहे. तीन दिवस विविध अध्यात्मिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ८६ कोटी ५१ लाखांचा लाभ

29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन:
२९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.

भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.

🔎 हे वाचलं का?:  SIR चा पहिला टप्पा यशस्वी; आता प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणीवर भर द्यावा- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत:
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. महाजन यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790