Nashik High Alert: आज दुपारपर्यंत सोडणार १५००० क्युसेक पाणी; नदीकाठच्या नागरिकांना इशारा
नाशिक (प्रतिनिधी): इंडिअन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटने नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे.
संततधार पावसामुळे गंगापूर धरण १०० टक्के भरल्याने आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
आज गंगापूरमधून १५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग केला जाणार असून नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.
आज दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, “सागर शिंदे (कार्यकारी अभियंता नाशिक) यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आज (दि. २९ सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो 15000 क्युसेक्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.” त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर धरण विसर्ग 10.00 वाजता 35000 व 11.00 वाजता 45000 क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.