नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर कुक्कुटपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

नाशिक। दि. १ मे २०२६: एव्हियन इन्फ्लूएंझा (बर्ड फ्लू) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नवापूर (जि. नंदुरबार) येथे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक व कुक्कुट व्यवसायिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ.प्रशांत धर्माधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चॉपरचा धाक दाखवत गणेश मंडळाकडून हप्ता वसुलीचा प्रयत्न; पाच दुचाकींची तोडफोड

सदर रोग कुक्कुट पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य व पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा, अंडी उत्पादनात अचानक घट, श्वसनास त्रास किंवा नाकातून स्त्राव येणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ व २० सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; नाव नोंदणीची संधी

कुक्कुटपालकांनी अशी कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, नाशिक, नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. माहिती प्राप्त होताच पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ पथक पाठवून नमुने संकलित करण्यात येतील व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येतील.

कुक्कुटपालक व्यावसायिकांनी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
• बाहेरील व्यक्तींचा पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश मर्यादित ठेवावा
• फार्म परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करावे
• मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी
• नवीन पक्षी आणताना त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवावे
• स्वच्छता व जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे

तसेच अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद घटना तत्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धर्माधिकारी यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790