नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एचएएलच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने आपल्या क्वार्टर मधील पंख्याच्या सहाय्याने फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ओझर टाउनशिप येथील नागरी वसाहतीतील टाईप सी थ्री २०५ येथे एचएएल कारखान्यातील इलेक्ट्रॉनिक अॅण्ड सिव्हिलचे चीफ मॅनेजर ग्यानसिंग इड्डासिंग दोडवा वय ५८ हे एकटे राहात असत..
दि. १६ रोजी ते कंपनीत कामावर गेले तद्नंतर ते अचानक आपल्या निवासस्थानी आले. याच दरम्यान त्यांच्या उत्तर प्रदेशातील नातलगांनी त्यांना फोन केले. परंतु नातलगाच्या फोनला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्या नातलगांनी एचएएल मधील दोडवा यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांना दोडवा फोन उचलत नसल्याचे सांगितले.
यावेळी दोडवा यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थान गाठत दरवाजा ठोठावला. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावुन बघितले असता त्यांना दोडवा यांनी फाशी घेतल्याचे दिसताच त्यांनी एचएएलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहीती दिली.
एचएएल सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बाबत ओझर पोलीसांना कळवले असता, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्यानसिंग दोडवा यांचा मृतदेह ताब्यात घेत एचएएलच्या रूग्णालयात दाखल केला.
दरम्यान दोडवा यांचे नातलग उत्तर प्रदेशात रहात असुन तेथुन ते येण्यास निघाले असुन नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. दोडवा यांच्या आत्महत्येचे कारण अजुन समजलेले नाही पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.