नाशिक: भेळविक्रेत्या वाघ खून खटल्यात सराईत गुंड कुंदन परदेशीला जन्मठेप; 7 आरोपींना शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील हनुमान वाडी परिसरात क्रांतीचौकामध्ये भेळविक्रेता सुनील वाघ याची दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सराईत गुंड कुंदन परदेशी यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तर, खूनाच्या कटातील चार आरोपींना सात वर्षे आणि मारहाणीत तिघांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे, खूनाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातील अजय बागुलसह १० जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने सरकारी पंचांसह १५ फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी रितसर कारवाईचे आदेशही दिले आहेत.

हे ही वाचा:  पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करून महिलेची फसवणूक...

क्रांती चौकात सुनील वाघ, हेमंत वाघ आणि मंदा वाघ यांचा भेळव्रिकीचा गाडा होता. २७ मे २०१६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कुरापतीतून आरोपींनी वाघ बंधूंवर हल्ला चढविला.

यात सुनील वाघ यांचा खून झाला होता तर हेमंत वाघ गंभीररित्या जखमी होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात परदेशी टोळीतील २१ जणांविरोधात खून, प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:  नाशिक: बनावट शासकीय नियुक्तीपत्र देत गंडा; भामट्याकडून 8 लाखांची फसवणूक

यात तिघे विधिसंघर्षिक बालकांचा समावेश होता. याप्रकरणात तत्कालिन पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये परदेशी टोळीविरोधात मोक्काही लावण्यात आला होता.

मात्र नंतर मोक्का रद्द झाला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक व्ही. झोनवाल यांनी केला होता.

सदरचा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश बी.व्ही. वाघ यांच्यासमोर चालला. यात प्रत्यक्ष साक्षीपुराव्यांनुसार न्या. वाघ यांनी मुख्य आरोपी कुंदन परदेशी यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

हे ही वाचा:  नाशिक: थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

तर, खूनाच्या कटातील सहभागी राकेश कोष्टी, जयेश दिवे, व्यंकटेश मोरे, किरण नागरे यांना प्रत्येकी ७ वर्षे सश्रम कारावास आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अक्षय इंगळे, रवींद्र परदेशी, गणेश कालेकर यांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. पंकज चंद्रकोर यांनी ३४ साक्षीदार तपासले. यातील १५ साक्षीदार फितूर झाले. याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790