नाशिक: गोठे धारकांनी 30 एप्रिल पर्यंत परवाना नूतनीकरण करावे :वाय.आर.नागरे

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शहर परिसरातील गोठे धारकांना 2025-26 वर्षा करीता परवाना नुतनीकरण व नवीन परवाना काढण्यासाठी 1 ते 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रातील सर्व गोठे धारकांनी परवाना नूतनीकरण व विनापरवाना गोठे धारकांनी नवीन परवाने काढून घ्यावेत, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, वाय. आर. नागरे यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक शहर परिसरासह गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विना परवाना अथवा विना अनुज्ञाप्ती गुरे बाळगणे यासाठी रुपये 2 हजार पर्यंत दंड व ३ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आण‍ि त्यांची ने आण करणे (नियंत्रण) अधिनियम 1976 कायद्याच्या अधिनियम कलम 13 (१) (ब) अन्वये करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम १९७६ हा कायदा लागू केला आहे. या कायद्यान्वये विना परवाना गुरे पाळणे, गुरांची ने आण करणे गुन्हा आहे. महानगरपालिका क्षेत्रातील गुरे परवाना धारकांनी नुतनीकरणासाठी येतांना सोबत मूळ परवाना व प्रति जनावर रूपये 50 अनुज्ञाप्ती शुल्क सोबत आणावे. 30 एप्रिल 2025 पर्यंत दिलेल्या मुदतीत परवाना नूतनीकरण न केल्यास प्रती जनावर 5 रुपये इतके विलंब शुल्क आकारण्यात येईल याची गोठे धारकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी नागरे यांनी कळविले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

गुरे परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढणे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय शासकीय दूध योजना आवार, त्र्यंबक रोड, नाशिक 422002 या पत्यावर अथवा 9552621893 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही नागरे यांनी केले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here