नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील गरजू रुग्णांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. आवश्यक अधिकारी-कर्मचाऱयांची नियुक्ती प्रक्रिया पुर्ण करून सदरील कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध करून देण्याकरिता संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री सचिवालयामार्फत आदेश काढण्यात आला होता.
नागरिकांच्या सोयीचा विचार:
आदेश जाहीर झाल्यावर एखादा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्थळ निर्धारित करावे लागते. हा प्रकल्प जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यान्वित करायचा असल्याने त्यासाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांच्या सोयीचे स्थळ निश्चित करणे, आवश्यक अधिकारी-कर्मचाऱयांची नियुक्ती करणे, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, आवश्यक संसाधने उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत खात्री करावी लागते एवढ्या प्रक्रिया पुर्ण करून नाशिक येथील कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
नाशिकमधील कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला असून कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक व नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.